ते

 काही दिवसापूर्वी चिंचवडच्या मोरया गोसावी गार्डनच्या बाहेर एक साठी पार केलेले काका चना वगैरे वगैरे जिनसांची गाडी घेऊन उभे होते. अंगातल्या मळकट कपडयांवरून त्यांची परिस्थिती फारशी बरी नाही हे कळंत होतं. हातगाडी सुद्धा त्यांच्या वयानुरूप त्यांची सोबत करंत जुनी झाली असावी.. हातगाडीवरची फाळकी झीजूनझीजून तुळतुळीत गुळगुळीत पाॅलीश केल्यासारखी झाली होती. तो तुळतुळीत गुळगुळीतपणा काकांच्या सोबतीची साक्षच देत होता. हातगाडीच्या फडतारावर चने, फुटाणे, भेळ, शेव, गरमगरम चवीष्ट बाॅईल्ड स्वीट कार्न वीथ चवीष्ट मसाला असं सगळंच रेलचेलून भरलं होतं. थोडं अनहायजेनिक होतं पण त्यात एक वेगळाच अोलावा होता, मायेचा! येणारा जाणारा ओळखीचा त्यांच्या गाडीवरून जाताना चनेफुटाणे तिर्थरूपांचा माल असल्यासारखा मुठीत भरून घेऊन जात होता आणि ह्या काकांचाही बापासारखा चेहर्यावरचा आनंद तसाच वाहून रहात होता.

मी, बायको आणि माझी मुलगी चिनू मंदिरातून आल्यावर आम्हाला मस्त चटपटीत काहीतरी खावंसं वाटंत होतं. त्यात काकांची गाडी समोर दिसली. तोडांला एकदा पाणी सुटलं की कसलं हायजीन अन कसलं काय. आम्ही स्वीट काॅर्न वीथ मसाला घेतलं. चव झकासच होती. स्वीट काॅर्नचा स्वीटपणा त्यात थोडसं मीठ व थोडा तिखट मसाला, 'व्वा! क्या बात है'. असं म्हणून चवीचवीनं संपवलंही. आम्हाला आवडलं म्हणून काकांनी परत भरून स्वीटकाॅर्न दिलं पण अगदी चकटफू. चिनूचं स्वीटकाॅर्न खाणं झाल्यावर बाईसाहेबांना शेव खायची इच्छा झाली. तिचे शब्द कानावर पडतात न पडातात तोच एका मोठ्या डिशमध्ये शेव भरून आली. वरती पाहिलं तर काका प्रेमानं शेव घेऊन उभे. खाणं आटोपल्यावर काकांना बील करायला सांगितलं. बील झालं होतं फक्त २०/- रूपये. मी तर उडालोच. फक्त २०/- !!!!!!. मला बीग बझारच्या बाहेर बसणारा, थिएटरच्या एसीत बसणारा, माॅल्समध्ये बसणारा स्वीटकाॅर्न वाला आठवला. आधी ५०/- रुपयाचं कुपण आणि मग नंतर एका छोट्या कपात भरून दिलेले स्वीटकाॅर्न्स. एअरपोर्टवर हेच स्वीटकाॅर्न शंभरी हमखास पार करतात. पण या सगळ्यात त्या काकांच्या मनातला, ह्रदयातला स्नेह चवीलाही कधी सापडला नाही की अौषधालाही. माॅलमधला दोन दाणे वर अाले म्हणून वरच्यावर काढून घेऊन सपाट करणारा तो मालक हितासू नोकर कुठे आणि दिलदार वृत्तीनं वाटणारा हा काका कुठे? दिल्यानं काही नाही वाढलं तरी समाधान नक्की वाढतं. आधीच फाटक्या असलेल्या झोळीतून काढून द्यायलाही खुप मोठं मन असावं लागतं. इथं लक्ष्मीपतींकडे खजाने आहेत पण त्या खजान्यातल्या लक्ष्मीच्या नशीबी जणू कारावासंच लिहिलेला. गरीबाच्या बटव्यातली लक्ष्मी त्यामुळेच जास्त नशीबवान व लक्ष्मीपतीच्या खजान्यातली बंदिस्त लक्ष्मी तेवढीच कमनशिबी. अश्या तृप्त, स्वच्छंदी लक्ष्मीची पूजा करणारे काका, या सगळ्यांमध्ये समाधानाच्या रेषा फक्त या काकांच्या चेहर्यावरच सापडल्या बाकी ठिकाणी कुठे हरवल्या कळलं नाही पण संभवतः त्या गिर्हाईकाच्या कपातून परत मालकाच्या पात्रात पडणार्या दोन दाण्यांच्या भोवतीच कुठेतरी त्या हक्काची जागा शोधत असणार हे नक्की.
Vd AJK

टिप्पण्या

  1. फक्त पैशांची श्रीमंती म्हणजे श्रीमंती नाही.
    तर मनाची श्रीमंती हिच खरी श्रीमंती आहे.
    हे दाखवून देणारे काका त्यांना मुजरा
    डॉ. साहेब तुम्हाला हि सलाम

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीर्ण शाल उरे शेवटी

सचोटी