सचोटी

*सचोटीची वृत्ती*

*परवा एक अतिशय गरिब कुटंबातला माणूस आपल्या बायकोला घेऊन आला. पाच दिवस अॅलोपॅथी ट्रीटमेंट घेऊनही अजिबात फरक नव्हता. कंबर आणि उजव्या मांडीमध्ये पाय प्रचण्ड ठणकत होता. रुग्णेला नीट बसता येत नव्हतं की झोपता येत नव्हतं. चालतानाही वेदना होत असल्याने वाकून व कुणाच्या तरी आधाराने चालण बर्याच सायासानं जमंत होतं. अतिशय बिकट अवस्था होती तिची.*

*घरची परिस्थिती खूपच गरिबीची. पेशंटचा नवरा मोलमजुरी करून घरातलं कसंबसं भागवायचा. "डाॅक्टर पाचशेच रुपये आणलेत" त्यानं तेही इकडून तिकडून गोळा करुन आणले होते. त्यांना धीर देऊन पैशाचा विचार आत्ता करू नका आपण आधी ट्रिटमेंट करू असं सांगितलं व ट्रिटमेंट चालू केली.*

*कंबरेत व मांडीच्या दुखर्या भागात व्यधाग्निकर्म केलं. रुग्णेला काहीसं बरं वाटलं. विशेषत: कंबरेच्या वेदना बर्यापैकी कमी झाल्या होत्या परंतु मांडीतल्या वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यामुळं दुसर्या दिवशी सकाळी परत बोलावून स्नेहन-स्वेदन व मात्रा बस्ति दिला. कर्म झाल्यानंतर रुग्णेला बराच आराम पडल्याचं जाणवलं. हलल्यावर निघणार्या चमका बर्यापैकी कमी झाल्या होत्या. बाय चांगलीच खूष होती. पुन्हा दुसर्या दिवशी कर्मासाठी येण्यास सांगितलं. रिसेप्शनला आधीच सांगितलं होतं की पैसे मागू नका.*

*परंतु दुसर्या दिवशी सकाळी रुग्णा काही आली नाही पण संध्याकाळी तिचा दादला म्हणजे नवरा भेटायला आला व बायकोला म्हणजे पेशन्टला गावाला नातेवाईकाकडं जावं लागलं असं त्यानं सांगितलं.*

*"पण आता पेशंटला कसं वाटतंय?" असं विचारल्यावर "आता तिला पूर्ण बरं वाटतंय व दोन दिवसांनी ती आल्यावर तिला नक्की घेऊन येतो' असं सांगता झाला. "मग तुम्ही कशासाठी अालात?" असं विचारल्यावर त्यानं झटकन खिशातले पाचशे रुपये पुढे केले. 'पैसे देण्यासाठी आलो होतो' असं म्हटल्यावर मात्र माझा चांगुलपणावरचा विश्वास कितीतरी पटीने वर उडून टोकावरच गेला.*

*यावरुन एक मात्र कळालं की चांगुलपणा, नैतिकता, चांगली वृत्ती ही गरिबी श्रीमंती पाहून वसत नाही तर ती असावीच लागते. चांगले चांगले म्हणणारे लोक "गरज सरो वैद्य मरो" असे वागतात. किंवा "तु कोण्या गावचा?" असा त्यांचा अविर्भाव असतो. जीव वाचवलेले लोकही भामटे असतात व एकही पैसा न देता केवळ हमी देऊन पळून जातात. पळून जातात यासाठी की परत त्या भामट्या चोरांचं मुखदर्शनच दुर्लभ होऊन बसतं. फोन उचलणं ही अवघड असतं त्यांच्यासाठी. कधीमधे फोन चुकून उचललाच तर "आत्ता येतो" असं म्हणून हेच भामटे वेळ मारून नेतात. वर्ष वर्ष उलटून जातात पण अशा वृत्तीची चोर लोकं मात्र परत येत नाहीत. पण शेवटी अश्या वृत्तीच्या जीव वाचवलेल्या भामट्यांना दैव परत भोगायला लावतंच. असो.*

*परंतु आज या गरीब माणसाकडे असणारी चांगल्या वृत्तीची श्रीमंती खूपच भावली. असे लोक समाजात आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास ठेवावा लागतो. व अश्या विश्वासामुळं आपलं मनही हलकं, आनंदी होत राहतं व अजून या चांगूलपणामूळं जग तगून आहे हे ही पटतं.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीर्ण शाल उरे शेवटी

ते