फर्गसन कथा

फर्गसन कथा


त्यादिवशीची रात्र जरा जास्तंच भयाण वाटंत होती. चंद्र डोक्यावरही नव्हता आणि लांबवर क्षितिजावरही.
            शंभरहून जास्त वर्षे पुराणं फर्ग्युसन काॅलेजचं होस्टेल. त्या आसमानी काळ्याकुट्ट वातावरणात अगदीच भितीदायक वाटंत होतं. चारही बाजुंनी दगडी चिर्यात बांधलेल्या दुमजली खोल्या हळूहळू अंगावर आल्यासारख्या वाटंत होत्या. खोल्यांच्या एकेका भिंतीची जाडी ३-३ फुट. मध्ये मोठा चॊक. वसतीगृहाच्या बरोबर मध्ये एक जुनं काहिसं वठलेलं नींबाचं झाड.  उत्तर व दक्षिण दिशेला एक एक मोठा दिंडी दरवाजा. वसतीगृहाच्या दक्षिण दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला पार आतल्या कोपर्यात एकाकी असल्यासारखं न्हानीघरं व स्वच्छतागृहं.
        वसतीगृहात जवळ जवळ शे दोनशे खोल्या. एखाद्या तुरंगासारखं किंवा चॊकाच्या वाड्याला शोभावं असं वास्तुशिल्प. दिवसा तेवढंच सुंदर पुरातन वारसा म्हणून शोभणारं. इंग्रजांच्या काळात सावरकरांसारखे मोठेमोठे स्वातंत्र्य सेनानी तिथे रहायला होते, शिकायला होते. बर्याच मोठ्या कारकिर्दिंना, इतिहासाला साक्षी अशी या होस्टेलची ख्याती होती.
       आत्ता वर्तमानात फर्ग्युसनमध्ये शिकणारे लांबचे विद्यार्थी तिथे रहात असंत. प्रत्येकाला एक वेगळी खोली असायची. बाहेरच्या बाजूला जाडजूड भींतीत एक भली मोठी खिडकी, समोर दार त्यावर झरोका, खोलीत एक खाट, टेबल, खुर्ची असा संभार. सगळ्या वस्तु अतिशय जुन्या एखाद्या अॅन्टिक पीससारख्या. त्यामुळे तो अनुभवंच वेगळा.
           सर्वजण असताना होस्टेलमध्ये धमाल असायची पण आज मात्र सगळेच जण दिवाळीच्या सुटीला आपल्या गावी गेले होते. त्यामुळं आजच्या रात्रीचं वसतीगृह पूर्वी कधी वाटलं नव्हतं एवढं भयाण वाटत होतं.  सगळीकडं अंधार दाटला होता. काळ्या ढगांनी आकाशाला कवेत घेतलं होतं. इतरवेळी नेहमी दिंडीदरवाजात खुर्ची टाकून बसणारा शिपाई चंदरही आजंच नेमका कुठं गायब झाला होता माहित नव्हतं. त्यामुळं होस्टेलला जास्तंच एकाकीपण आलं होतं.
         परंतु रूम नंबर ४८ च्या वरच्या झरोक्यामधून मात्र थोडा उजेड बाहेर डोकावत होता. सगळीकडे पसरलेल्या अमर्याद अंधारात तो प्रकाशसुद्धा दाबल्यासारखा वाटंत होता. एखाद्या महाकाय गोष्टीविरूद्ध लहानश्या गोष्टीची अस्तित्त्वासाठीची धडपड असं काहीतरी त्या तिमिर प्रकाशाच्या खेळाचं झालं होतं. निदान आज तरी तो अंधार सगळंच खाऊन टाकेल की काय अशी रॊद्रता जाणवंत होती. शांतता सुद्धा भयानक वाटावी आणि तीनं तलवारीसारखं काळजाला कापत जावं असा, चांदण्यावीणा शांत आकाशाचा भेसूरपणा त्या वसतीगृहात अवतरला होता अशावेळी कळतं की शांततेला सुद्धा शब्द असतात, कधी प्राज्ञ सात्विक तर कधी असे भेसूर.
            अठ्ठेचाळीस नंबर मध्ये "अन्वय" होता. आख्ख्या होस्टेलमध्ये एकटाच!
आंधार्या पोकळीत आपल्या तुटपुंज्या प्रकाशाला सांभाळत. त्याचे व्हेकेशन्सचे क्लासेस चालू होते म्हणून तो घरी गेला नव्हता. त्याचे सर्व मित्र एव्हाना घरी होते. त्यामुळं तो एकटाच जसा त्या अंधार्या रात्रीची जबाबदारी सांभाळत होता. रात्रीची अकराची वेळ होती. झोपण्यापूर्वी त्या अंधार्या रात्री स्वच्छता गृहाकडे जाण्यासाठी अन्वयनं दरवाजा उघडला आणि समोर पसरलेला अंधार, निर्मनुष्यता बघून त्याचं काळीज भितीनं भरून गेलं. त्यानं कधी एवढी भयाणता अनुभवली नव्हती. नेहमी गजबजलेलं होस्टेल आज मात्र त्याचं वेगळेपण सांगत होतं. परिस्थितीनुरूप आयुष्यही बदलतात आणि अर्थही तसे त्याचे अर्थ बदलले होते. निर्मनुष्यतेनं आणि तमाच्या अंधकारानं होस्टेलचा खरा चेहरा आज अन्वयसमोर नाचत होता. पण त्याच्या भीतीला एका वेगळ्याच गोष्टीचा संदर्भ होता. कारण.....कारण वेगळं होतं. एखाद्या चित्राला वेगळं बॅग्राऊंड मिळावं अन् ते जास्त उठावदार दिसावं तसं त्या थरारक गोष्टीला त्या अंधार्या रात्रीचं बॅग्राऊंड मिळालं होतं. निर्मनुष्यता, काळोखी रात्र, ते अवाढव्य चिरेबंदी वसतीगृह आणि ती काही वर्षांपूर्वी अन्वयच्या शेजारच्या खोलीत घडलेली गोष्ट आणि एकटा अन्वय या सर्वांचा शैतानी संयोग म्हणजे एखाद्या भुताटकीच्या थरारपटाचा प्रत्यक्ष अनुभवंच होता.
            सागरनं, अन्वयच्या मित्रानं होस्टेलमध्ये घडलेला एक भयानक प्रकार त्याला सांगितला होता. अन्वयच्या शेजारच्याच जीन्याच्या अगदी मागे असणार्या खोलीत दोन वर्षापूर्वी घडलेली घटना. पण दार उघडल्यावर अन्वयला एखादं नको असलेलं पात्र आयुष्याच्या रंगभूमीवर अवचित अवतरावं आणि त्यानं हिडीस नृत्य करावं तशी ती घटना त्याच्या मनात प्रवेश करून अनिर्बंध नाचू लागली. भीतीनं मन बधिर झालं. मनाच्या भयग्रस्त अवस्थेत त्याला सर्व गोष्टी समोर घडंत आहेत अशा भासू लागल्या.
           तेच दिवाळीच्या आधीचे दिवस व कदाचित तोच आजच्या गिनतीचा काळोखा दिवस. त्या जीन्यामागच्या खोलीत गोल्डी रहायचा. गोल्डी एकदम बिनधास्त प्रवृत्तीचा, बेदरकार. त्याला सिगारेटचं व्यसनं होतं. कधी कधी दारू सुद्धा घ्यायचा. बापाची श्रीमंती. सिगारेट सुद्धा चाॅकलेटी रंगाच्या लांबड्या, पातळ व उंची असायच्या. नव्वदच्या दशकातसुद्धा तीस पस्तीस ला एक मिळायची. खास गोल्डीचा बाप त्याच्यासाठी परदेशावरून  मागवायचा. बापानं पोराच्या व्यसनाची एवढी काळजी घेणं जरा विचित्रच वाटायचं पण श्रीमंतांचे थाटंच वेगळे. संस्कारांपेक्षा श्रीमंती चैन याचंच आप्रुक जास्त, याचाच आनंद जास्त. त्यामुळं वाटतं की व्यक्तीनिष्ठ आनंद हा वेगवेगळा असतो. कोणाला दूध, कोणाला चहा तर कोणाला दारू आवडणं हा प्रकृतिचाच भाग. बारावीतला कोवळा पोर पण संस्कारांशिवाय पार वाट भरकटला होता. चंगळवाद त्याच्या आयुष्याचा संस्कार म्हणूनंच चांगला मुरला होता. गोल्डीसुद्धा या राजसतामस आनंदाला सरावला होता व त्याचा बापसुद्धा विषवृक्षाला पाणी घालावं तसं त्याच्या इच्छा बिनबोभाट पुरवित होता. वाट सावरणारे बाप आणि वाट चुकवणारे बाप यातला फरक फार मोठा. साधारण परिस्थितीतून जीवनावर होणारे संस्कार खर्या आनंदाचेच दर्शन घडवतात. प्रथमदर्शनी जरी शरीरााचं सुख मोठं वाटलं तरीही शेवटी प्रत्येकाचा प्रवास हा शाश्वत आनंदाकडेच जाणारा असतो. कुसंस्कार थोड्या काळासाठी रमवतीलही परंतु आत्मानंद खर्या संस्कारांना वाट करून देतोच. फरक फक्त काळाचा व केव्हाचा एवढाच असतो. या कुसंस्कारी काळाच्या गर्तेत गोल्डीमात्र आतातरी सापडला होता. हि बाजू चुकीची आहे हे सांगणारं जीवाभावाचही कोणी नव्हतं.
        त्या रात्रीसुद्धा सगळं होस्टेल सुनंसुनं होतं. गोल्डी दिवसभर बाहेर असायचा व फक्त रात्री झोपायला यायचा. त्या रात्री गोल्डी दहा साडेदहाच्या सुमारास होस्टेलवर आला. त्याच्या हालचालींवरून त्यानं दारु घेतली होती हे स्पष्ट जाणवंत होतं.  त्या अवस्थेत कोणाला तरी इंग्लिशमध्ये शिव्या देत होस्टेलमध्ये दाखल झाला. थरथरणारी पावलं त्याला दुसर्या वाटेला नेत होती. पण काहिसं शुद्ध मन त्याला परंत होलपटंत जागेवर आणंत होतं. ती रात्रसुद्धा आजसारखीच भयाण वाटंत होती. सर्व मुलं गावाला गेलेली. सगळीकडं गडप करणारा अंधार. पण त्या अंधाराची तीव्रता, भयाणता गोल्डीच्या बधिर मनापर्यंत पोहचंत नव्हती. मदिरेचा अंमल तनमनात भिनला होता. मोठ्या कष्टानंच गोल्डी त्याच्या खोलीपर्यंत गेला. त्या परिस्थितीत गोल्डीनं थरथरत्या हातांनी कुलूप धरून कशीबशी चावी कुलपात सरकवली. कुलुप उघडून आतला लाईट लावला. दार बंद केलं व स्वतःला त्यानं अनियंत्रितपणे काॅटवर अक्षरशः झोकून दिलं. त्याची शुद्ध हरपली. गाढ निद्रेच्या अंमलाखाली गोल्डी घोरू लागला. त्या अवस्थेत त्याला अंगावरच्या कपड्याचही भान नव्हतं. लाईट बंद करायला सुद्धा तो विसरला होता. आता त्या अंधारात केवळ गोल्डीच्या रूममधूनच  प्रकाशाचा कवडसा झरोक्यातून बाहेर डोकावत होता.
        त्यावेळचा वाॅचमनसुद्धा जागेवर नव्हता. वसतीगृहाचा पुढचा दिंडी दरवाजातला छोटा दरवाजा सताट उघडा होता. कोणाला त्याचं भान असायचं कारणंच नव्हतं. वेळ पुढे सरकंत होती. मध्यरात्रीच्या वेळेपर्यंत येऊन थांबल्यासारखी झाली. गार वारा हळूवार शिट्टी वाजवत तिथल्या चौपासात वहात होता. एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभावा असा आवाज वार्याच्या विचित्र वाटणार्या लहरीतून उमटंत होता. दिवाळीच्या आधीच्या दिवसातही काळ्या ढगांचे पुंजके आकाशातल्या चांदण्यांचा प्रकाश आडवीत होते. काळाकुट्ट अंधार सगळीकडं दाटला होता. काहीतरी अघटित करण्यासाठी सगळंच कसं जुळून आलं होतं.  होस्टेलच्या बाहेरच्या मोठ्या घडाळ्यातून दोनचे दोन ठोके झाले आणि......
      वसतीगृहाच्या उघड्या दरवाज्यातून काळा बुरखा घातलेल्या एका व्यक्तीने प्रवेश केला. पायाखालची वाट असल्यासारखी ती व्यक्ती त्या अंधारातही सफाईदारपणे चालत होती. हळूहळू जिन्यामागच्या रूम नंबर सत्तेचाळिसकडे म्हणजे गोल्डीच्या रूमकडे ती व्यक्ती वळली व तीथपर्यंत गेली. दाराला कान लावून कानोसा घेतला. खोलीतून घोरण्याव्यतिरिक्त कोणताही आवाज येत नव्हता. शेजारच्या कोपर्यात हात तुटलेली खुर्ची पडली होती. तिला गोल्डीच्या दारासमोर सरकवून त्या व्यक्तीनं दारावरच्या उघड्या झरोक्यातून डोकावून पाहिलं. गोल्डी मेल्यासारखा झोपला होता. घोरंत होता. त्या व्यक्तीनं चपळाईनं खाली उतरून बुरख्यात लपवलेलं लांबडं चाकूसारखं धारदार शस्र काढलं, दोरी काढली. शेजारी कोपर्यात झाडू बांधलेली काठी होती. त्या काठीच्या दुसर्या टोकाला ते शस्र दोरीनं घट्ट बांधलं. आता घातासाठी सामान तयार होतं. ती व्यक्ती पुन्हा खुर्चीवर चढली. धारदार शस्राचं टोक झरोक्यातून आत घातलं. हातानं काठी हळूहळू आत सरकवली. टोक गोल्डीच्या गळ्यापर्यंत गेलं. आता फक्त एकंच झटका हवा होता. गळ्यातून ते शस्र आरपार करण्यासाठी त्या व्यक्तीनं काठी जोरात गोल्डीच्या गळ्याच्या दिशेनं दाबली आणि  तिथल्या तिथं कोंडणारी किंकाळी गोल्डीच्या तोंडातून बाहेर निघाली. त्यानं दोन्ही हातानं गळ्यातल्या शस्राला धरलं. सगळीकडं रक्त सांडू लागलं. गोल्डी डोळे मोठे करून आर्तपणे झटपटंत होता. अोरडण्याचा प्रयत्न करंत होता पण आवाज निघंत नव्हता. अर्धा तास तो त्याच अवस्थेत जगण्याचा संघर्ष मृत्युच्या काठावर करंत होता. उठण्याचं बळ कधीच संपलं होतं व हळूहळू तो उर्जाहिन होत काळाच्या कुशीत विसावला.
            हे सर्व अन्वयला समोर दिसंत होतं.  गोल्डीच्या आर्त किंकाळीच्या भासासकट गोल्डीच्या खुनाचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्यासारखा झाला होता व अन्वयच्या पायातलं त्राणंच नाहीसं झालं. समोर गडद अंधार. त्या अंधारात अन्वयला कल्पित आकृत्यांचे भास होऊ लागले. सर्व वातावरण, भूतकालातली घटना त्याच्या मनावर हावी होऊ लागल्या. गोल्डीचा खून झाल्यापासून मुलांमध्ये भूताखेतांच्या गोष्टींचं चांगलंच पेव फुटलं होतं. त्या सर्व पूर्वग्रहदूषित संभाराला मनात घेऊन अन्वय जास्तंच घाबरला होता. शिवाय खून झालेली खोली त्याच्या बरोबर शेजारचीच होती. त्यातही क्षणभर कसंतरी अन्वयनं स्वतःला सावरलं. मनातल्या मनात देवाचं नाव घेणं चालू केलं. आता पुढचे भासही काहीसे कमी झाले होते. त्यानं कसंबसं स्वच्छतागृह गाठलं. सर्व आटोपून पळतंच खोलीत घुसला. खोलीचं दार घट्ट बंद केलं. वरचा झरोका घट्ट लावून घेतला. ह्रदय भीतीच्या उद्रेकानंतर चांगलंच दडधडंत होतं. देवाचं नाव घेत घेत जागत जागत त्यानं सबंध रात्र काढली.
           रात्रीची कुस फोडून बाहेर आलेल्या सकाळच्या प्रहरानं त्याच्या मनातल्या सगळ्या भूतांना पिटाळून लावलं. आता गोल्डीच्या आठवणी शब्दातंच आठवत होत्या. रात्रीचा काळचित्रपट पूर्ण सरला होता. परंतु त्याच्या मनावरच्या कालच्या रात्रीच्या पाऊलखुणा तशाच होत्या. कदाचित येणार्या दुसर्या दिवशीच्या रात्रीच्या भयाणतेला परत एकदा बळ देण्यासाठी.

                                   Vd. Atul J Kale

x

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीर्ण शाल उरे शेवटी

सचोटी

ते