किचन

किचन

लाॅकडाऊनमध्ये सगळंच बंद. 
प्लंबरपासून न्हाव्यापर्यंत 
आणि 
भाजीवाल्यापासून हाॅटेलींगपर्यंत.

 हाॅटेलींग..... 
का तर काळाची गरज.. 
अन् दुसरं काय?

 आजकालच्या माॅडर्न गृहिणी कामामुळं म्हणा, कंटाळा म्हणा किंवा जंक फुडचा जिभेला लागलेला चटका म्हणा आठवड्यातले फक्त सातच दिवसं बाहेरचं जेवण मागवतात.

    पूर्वी तर बिचार्या नवरोबाला किंवा प्रत्यक्ष बायकोबाला सुद्धा पार्सलसाठी हाॅटेलांबाहेर गर्दी करावी लागायची. हे झोमॅटो आणि तत्समांनी बरोब्बर ओळखलं आणि पूढं घरच्या घरी या बायाबाप्यांची सोय करुन टाकली.
       नीट पाह्यलं तर लक्षात येईल की या बायाबाप्यांनी हाॅटेलींगमधल्या कितीतरी संस्थांचा केवढा मोठा अर्थभार उचललाय. त्यामुळे भलेही किचन संकुचित झालं असेल पण चार माणसांची पोटं भरायला लागली हे बाकी खरं.

      आणखी पुढे जाऊन मला तर वाटतंय कि एखादी बापडी आपल्या बाप्याला म्हणेल, "अरे ....... (जे नाव असेल ते) तसाही आपल्या किचनचा काहीच युज नाही, आपण तिथं आणखी एक छोटंसं बेडरूम काढूयात का म्हणजे आपलं होणारं बाळ तिथं झोपेल?"
      यावर तो नंदी नंदीबैलासारखी मान डोलावून अनुमोदनही देईल आणि म्हणेल, 'तु म्हंशील तसं'.

हे वास्तव पाहता काही दिवसात बिल्डरकडूनंच फ्लॅटमधकं किचन सुद्धा गायब झालं तर नवल वाटायला नको. हाय काय अन् नाय काय ????....

पूर्वीचं किचन किती मोठ्ठं आणि ऎसपैस असायचं ना...? आता कसं संकुचित झालंय, मुरझलंय.......जेमतेम आठ बाय आठचंच ते. अगदी आजकालच्या पायापाशी पाहणार्या माणसावाणी. त्यात अंग चोरुन फक्त स्वयंपाक काय म्हणतात ना तो, आणि तोही करायचा असल्यास करायचा. नाही तर आहेच 'झोमॅटोबाबाकी' जय. सैपाक म्हंजी कध्धीतरी आ‌ॅकेजनली करायची गोष्ट, कशाला घालवायची येवढी जागा त्यासाठी. शहरात फुटाफुटाला किती महत्त्व!!!!
 
'अगदी बरोब्बर आहे आधुनिक सूनबाईंचं......'
            सासर्याने एखाद्या सुगरण सासूलाच उलटा धडा शिकवावा.

'अहो आजकालची पोरं बाहेर पडतात, पाठ मोडेतोवर काम करतात. हे असंच चालणार. आपली संस्कृती, चालीरिती सगळं सगळं गुंडाळून गावच्या जुन्या घराच्या खुंटीला टांगून या आता.' आधुनिक सासरा बरळला.

'अहो पण कपाळ आन् कपडे, बाई गं..गं, बघवंत नाही, कसं होतं आमच्या काळी.' सासूनं गपकन आठवून डोळेच मिटले...

'नका बघू मग. तुम्हाला येकदाच सांगतो, सूनेला भोंड्या कपाळावर कुंकू किंवा किमान टिकली तर लावायला अजिबातच सांगू नका बरं.. ती बिचारी काम करणार का टिकल्या सांभाळणार. ड्रेसचं म्हणाल तर टि शर्ट बेस्ट. अगदी ऎसपैस. कशाला पाह्यजे हो तुमचा पंजाबी ड्रेस?'

    असा सासरा म्हणजे सुसंस्कारांचा उगीच वाटणारा बागुलबुवा फोडणारा, सगळं खुंटीवर टांगणारा आधुनिक युगाचा charming old heroच बरं. असो.

    किचनपासून संस्कृती पर्यंत सासूसासर्यांनी बरंच ताणवलं नाय का? मग परंत येऊ जरा किचनकडं. 

     आमच्या चाळीतल्या १००-१२० स्क्वेअर फुटांच्या घरातलं किचनही यापरिस मोठं असायचं. येवढ्या मोठ्ठ्या फ्लॅटमध्ये येवढ्या यामेनिटिज पण किचन मात्र बिच्चारं खोपच्यात असल्यावाणी आंग चोरुन बसलेलं.
 
    अरे किचन कसं असायला पाह्यजे, ह्ये..... भलं मोठ्ठं!!!!!
    आन् आसलं तर बिगडलं काय हो? अहो ज्याचं किचन मोठं त्याचं ह्रद्य आपोआपच मोठं. म्हणजे cardiomegaly नाय बरं.....मनानं मोठं.
      खरं सांगू का राव, आजकाल या छोट्या छोट्या किचनमुळंच माणसं आप्पलपोटी झाल्यावाणी वाटतात.
        येखाद्याकडं गेलं की 'पाणी हवंय का?' आसं विचारतात हो!!! 
      आहो साहेब आमच्या पूर्वीच्या सयपाक घरातून आलेला पाव्हणा उपाशी काय जायील? काय बिशाद त्याची? तसा तो ही आगंतुकंच असायचा. तिथीवर न येणारा तो अतिथी. अहो तिथीवर यायला मोबाईल्स कुठं होते तेव्हा? कुणीबी आला की टाक चहा, दुसरा आला की लाग सैपालाला. आसं होतं आपलं जुनं आयुष्यं आन् त्यातलं सैपाकघरही. 

         आजकाल मात्र बिल्डिंगच्या कुठल्या फ्लॅटात यजमान रहात असतो ते बी कळंत नाय बगा. बिल्डिंगच्या मोठ्या गेटावरच आडवतात ते येगळंच. तिथला चौकीदार यजमानाला फोन लावतो आन् विचारतो की 'क्या सर भेजनेका है क्या मेहमानको?'. यजमानाला cctv त दिसतं की कोण आलंय, आन् पाव्हणा नको आसला की पाव्हण्याला सरळ घरी नाही म्हणून सांगून टाकतो. सगळी शिष्टिम कशी येक नंबर झकास.
 
         इतिहासात गड किल्ले होते, सुरक्षा होती, पहारा होता. अगदी समदं तस्संच इथंही. फरक येवढाच की इथं प्रत्येकजणाचं स्वत:चं राज्य येका बिल्डिंगीत, येका फ्लॅटात कोंबून राह्यलेलं.

         इथे स्वकिय, आप्त घरी येणं म्हणजे परकियांचं आक्रमण समजलं जातं. पूर्वी लांबलांबचे नातेवाईक म्हणजे उदाहरणार्थ याच्या तिच्या मामाच्या मेव्हण्याच्या मावशीच्या पुतण्याच्या आत्याचं आगमन व्हायचं आणि पंधरा पंधरा दिवस ती रहायची. तीही अगदी झोकात. 'असे पाहुणे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती' अगदी तश्शी.
        पण आजकाल ह्याच प्रकारातले पाव्हणे एखाद्या दुर्मिळ प्रजातीसारखे नामशेष होत चाललेले दिसतात.

       सध्याच्या काळात तर सख्खे भाऊ-बहीण देखील फ्लॅटात टेकले रे टेकले की लगेच निघतात. नको रे बाबा किंवा बाई, त्याला किंवा तिला उगीच आपला त्रास किंवा कामंच एवढी असतात हो की दोन तास बुड टेकवणं सुद्धा सध्याच्या काळात अवघड झालंय. थोडक्यात काय तर मनं संकुचित होत चाललीत.

       पूर्वी नव्हतं हो असं. दुसर्याच्या घराला, शेजारच्या घराला आग का लागेना, आपल्याला काय त्याचं? ..... असं म्हणणारे नव्हते पूर्वी !!

     लोकं इभ्रतीलाही जपायची आणि दुसर्याला झोकून मदतही करायची. दुसर्यासाठी वेळ द्यायची. त्यांची स्वयंपाक घरंही मोठी होती, ह्रदयं मोठी होती. त्यामुळं कोणाच्याही घरापर्यंत कधी कुठली आग पोहोचलीच नाही.

Vd. Atul J Kale
(25/02/2022)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीर्ण शाल उरे शेवटी

सचोटी

ते